श्रीमद् भगवद्गिता हा मानवांचे कल्याण करणारा महान ग्रंथ आहे.तो सर्व मानवमात्रांसाठी आहे कारण त्यात सर्वांना कृतार्थ करणारे असे कल्याणप्रद तत्वज्ञान आहे.अनेक महान तत्वचिंतक व ज्ञानी या गीतेच्या तत्वज्ञानरुपी अमृताचे प्राशन करुन धन्यता पावले आहेत.यामध्ये आद्य शंकराचार्य,रामानुज,संत ज्ञानेश्वर,माधवाचार्य, लोकमान्य टिळक,योगी अरविंद घोष,रवींद्रनाथ टागोर,रामकृष्ण परमहंस,स्वामी विवेकानंद,स्वामी परमहंस योगानंद,स्वामी चिन्मयानंद,प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज,श्री स्वामी प्रभुपाद,सर्वपल्ली राधाकृष्णन,पंडित मदन मोहन मालवीय,जयदयालजी गोयंका,श्री रामसुखदासजी महाराज,अल्डुस हक्सले,हेन्री थोरो,हर्मन केसर्लिग,हर्मन हेस्से,राल्फ इमर्सन,लाॅर्ड हेस्टींग्ज,रुडाॅल्फ स्टेनर,कार्ल जुंग,अल्बर्ट आईन्स्टाईन,अॅमाॅस अलकाॅट,वाॅल्ट व्हिटमॅन,फ्रँकलिन एडगर्टन,राँबर्ट ह्युमे,टी.एस.ईलिएट,अल्बर्ट स्केव्हिट्झर,डाॅ.अॅनि बेझेंन्ट,कार्ल हंम्बोल्डथ,सुनिता विल्यम्स इ.चा उल्लेख करता येईल. गीतेच्या तत्वज्ञानाने सर्वांना आकर्षित केले आहे. गीतेतील तत्वज्ञानाने प्रत्येकाला आपल्या अंतर्यामी असलेल्या सत्याच्या आर्ततेची साद घातली आहे. श्रीमद् भगवद्गिता ही सर्व मानवांच्या घरोघरी आणि ह्रदयात विराजमान होणे हे मनुष्याच्या मंगलमय जीवनाचे द्योतकच म्हणावे लागेल.दुरितांचे तिमीर जावो। विश्वस्वधर्म सुर्ये पाहो । जो जे वाछिल तो ते लाहो। प्राणिजात ।। असे हजारो वर्षापूर्वी पसायदान मागणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सकलविश्वाचे कल्याण करण्यासाठी याच ग्रंथाची निवड करुन त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच गीता ही सर्वसामान्य मराठी बोली भाषेत सांगितली व ती किती विश्वकल्याणास्तव उपयोगी आहे हे सिध्द केले होते.पण आज काही कखग शिकणारे तथाकथित विद्वान उगाच गीतेत काय आहे असे म्हणून ती न वाचताच चुकीचे अर्थ काढुन विरोध करतात तेव्हा त्यांच्या ज्ञानाची कीव कराविशी वाटते.संस्कृतचे ज्ञान नाही ,धर्माचा स्पर्श नाही ,श्रध्दावान चित्त नाही अशांना त्यात सत्य कसे सापडणार ? त्यामुळे त्यांना त्यात काय आहे हे कितीही निक्षून सांगितले तरी कसे कळेल? अंधाना प्रकाशाबाबत कधी कळले आहे का तद्वतच हे आहे.आज विश्वात अराजकतेचे,द्वेषाचे, शत्रुत्वाचे वातावरण मोठ्या झपाट्याने निर्माण होत आहे.मनुष्याचे मन अतिशय तीव्रतेने अस्थिर ,चंचल होत चालले आहे. किंबहुना चंचलता हा मनाचा स्थायी स्वभाव आहे पण त्यात आजची स्थिती पाहता ती तीव्र करण्यात आधुनिकता ,यांत्रिकता हे इंधनाचे कार्य करत आहेत. त्यात भर म्हणून सततची धावपळ आणि कामाची व्यस्तता यामध्ये तो गुरफटून गेला आहे. मनात असंख्य विचार आणि तणाव यामुळे झोपेचे टायमिंग यंत्राप्रमाणे बिघडत चालले आहे. कामाच्या क्षणी अचानक संताप, वैताग,ग्लानी येत आहे. मनुष्य प्रचंड तणावाखाली वावरतांना दिसून येतो आहे. एक अशांत व्यक्ती दहा अशांत व्यक्ती निर्माण करत आहे. त्यामुळे अशावेळी कोणत्याही द्वेषमुलक कृती किंवा उपदेश उपयोगी पडणार नाहीत. आपणास ही मनोहारिणी गिता माऊलीच सहाय्यतेला येणार आहे आणि तिची उपादेयता महत्त्वाची असणार हे तितकेच खरे आहे.(विनोद मराठे)

No comments:
Post a Comment